जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील सुभाषवाडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बाहेर खेळत असलेला नातू घरात पाणी पिण्यासाठी गेला त्या वेळी ही घटना कुटुंबियांना समजली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बद्रीसिंग पुना चव्हाण (वय ५८, रा. सुभाषवाडी ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. बद्रीसिंग चव्हाण हे पत्नी, दोन मुले आणि सुना यांच्यासोबत राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. त्या तणावात ते राहत होते, असे नातेवाईकांनी सांगितले. (केसीएन) मंगळवारी दि. १६ रोजी सकाळी त्यांची पत्नी, दोन्ही मुले आणि सुना शेतात गेले होते. त्यावेळी त्यांचे नातू आणि बद्रीसिंग चव्हाण हे घरीच होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला.
त्यांचा नातू पाणी पिण्यासाठी घरात आला तेव्हा ही घटना उघडकीला आली. तेव्हा त्याने कुटुंबातील इतरांना माहिती दिली. त्या वेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.