Monday, December 23, 2024
Homeक्राईमपत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून फरार झालेल्या पतीला शिताफिने अटक

पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून फरार झालेल्या पतीला शिताफिने अटक

-

जळगाव प्रतिनिधी । अयोध्या नगरात पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पतीविरोधात ६ जुलै रोजी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार झालेल्या पतीला एमआयडीसी पोलीसांनी जामनेर शहरातील बोदवड रस्त्यावरून रविवारी २८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अयोध्या नगरात अजय राजमल चव्हाण वय-३५ हा आपल्या पत्नी कोमल अजय चव्हाण वय-३२ यांच्यासह वास्तव्याला आहे. ४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अजय चव्हाण आणि त्यांची पत्नी कोमल चव्हाण यांच्यात वाद झाला. या वादात संतापाच्या भरात अजय याने पत्नी कोमलच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर दुखापत केली. त्यानंतर तो अयोध्या नगरातून फरार झाला. जखमी झालेल्या कोमल यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांना दिलेल्या जबाबावरून शनिवारी ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता पती अजय चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना संशयित आरोपी अजय चव्हाण हा जामनेर शहरातील बोदवड रोडवर असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि निलेश गोसावी, पोउनि रविंद्र चौधरी, पोना विकास सातदिवे, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ नितीन ठाकूर यांच्यासह जामनेर पोलीसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे.

Related articles

ताज्या बातम्या