जळगाव प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील उपनदेव जाणाऱ्या रस्त्यावर निर्जळ ठिकाणी गावठी कट्ट्यातून फायरिंग करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विशाल राजेंद्र ठाकूर रा. इंदिरानगर अडावद आणि रोहन रवींद्र पाटील रा. लोणी ता.चोपडा असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील उपनदेव रोडवरील एका शेतातील निर्जळ ठिकाणी विशाल ठाकूर याने फायरिंग केली होती. याबाबतचा व्हिडिओ देखील व्हाट्सअपवर व्हायरल झाला होता. दरम्यान कोणताही पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, स.फौ. अतुल वंजारी, पो.कॉ. हरिलाल पाटील, विष्णू बिऱ्हाडे, हेमंत पाटील, प्रदीप सपकाळे, भरत पाटील, प्रदीप चवरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी विशाल ठाकूर याला ताब्यात घेतले. त्यांनी हा कट्टा रोहन पाटील यांच्यासोबत खरेदी केल्याचे सांगितले आणि हा कट्टा रोहन पाटीलकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रोहन पाटील याला देखील ताब्यात घेतले असून त्याच्या जवळील ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि ४ जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.