धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळील चैताली जिनींगजवळ कार आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पिंप्री येथील दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना रविवारी १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात घटनेबाबत नोंद घेण्याचे काम सुरू होते. रॉबिन संजय सोनवणे वय-२२ रा. पिंप्री ता. धरणगाव असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावातील चैताली जिनिंग जवळील रस्त्यावर रॉबिन सोनवणे आणि त्याचा भाऊ रोहित सोनवणे हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीई ६६४९) ने निघाले होते. त्यावेळी दुचाकी जळगााव -धरणगावच्या मुख्य रस्त्यावर लागल्यानंतर जळगावकडून धरणगावकडे जाणाारी भरधाव कार आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात रॉबिन सोनवणे याचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर त्याचा सोबत असलेला त्याचा भाऊ रोहित सोनवणे हा गंभीर जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या रोहितला तातडीने नजीकच्या धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा अपघात एवढा मोठा होता की दोन्ह वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत धरणगाव पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे पिंप्री गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.