जळगाव प्रतिनिधी । भरधाव इंडीका कारने दुचाकीला समोरून धडक दिल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना पहूर ते सोनाळा मार्गावर रविवारी १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. गजा कालूराम बारेला (वय २५, रा. ठाठर कमला ता.जि. बऱ्हाणपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, गजा कालूराम बारेला हा तरूण आपल्या आई, आणि दोन भाऊ यांच्या सोबत वास्तव्याला होता. तीन महिन्यांपूर्वी गजा बारेला हा मोठा भाऊ अजय काळूराम बारेला (वय ३०) लहान भाऊ राजू कालूराम बारेला (वय-२५) तसेच नातेवाईक दशरथ बहादूर बारेला (वय-२०) यांच्यासह मजुरीसाठी जामनेर तालुक्यातील सोनाळा येथे आनंदा नामक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राहायला आले होते. तीन महिन्यापासून त्यांचा मुक्काम सोनाळा येथेच आहे.
पहूर येथे रविवारी १४ जुलै रोजी दुपारी बाजारनिमित्त अजय, गजा आणि राजू हे सखे भाऊ आणि दशरथ बारेला अशी चौघेजण एकाच दुचाकी वर गेलेले होते. खरेदी करून झाल्यावर सोनाळा येथे परत येत असताना संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या इंडिका कारने दुचाकीला जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. जखमींना सुरुवातीला पाहून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र तिथून संध्याकाळी पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणी गजा कालूराम बारेला याला वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून मयत घोषित केले. तर जखमी झालेल्या अजय बारेला, राजू बरेला आणि दशरथ बारेला या तिघांवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गजा बारेला याच्या मृत्यूची माहिती कळताच कुटुंबीयांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता.