जळगाव प्रतिनिधी । शहरापासून काही अंतरावर असलेल्या वाढीव वस्ती असलेल्या पांडुरंग, पंढरपुर व सुधाकर नगरात भागात आठ ते दहा जणांच्या टोळीने झोपडीपासून ते बंगल्यांमध्ये एकाच रात्री चोरी केली. याठिकाणाहून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. एकाच रात्रीमध्ये चार घरांमध्ये चोरी केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरापासून काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या वाढीव वस्ती भागातील पांडुरंग नगरात धिरज वाघ हे वास्तव्यास आहे. त्यांना काही रक्कम मिळालेली असल्याने त्यांनी ती रोकड घरातील कपाटात ठेवलेली होती. दरम्यान, रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातल्या कपाटात ठेवलेली दोन लाखांची रोकड आणि १५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्यानंतर चोरट्यांनी त्या परिसरात बंद असलेल्या अन्य तीन घरांमध्ये चोरी करुन तेथून रोकडसह सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
पांडुरंग नगरातील निवृत्ती सोपान उतरकर यांनी कर्ज काढलेले असून त्याचा हफता भरण्यासाठी घरात दहा हजार रुपये ठेवलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरातून ती रोकड चोरुन नेली. हप्त्याचे पैसे चोरीला गेल्यामुळे उतरकर कुटुंबिय हताश झाले होते. तसेच त्याच परिसरातील पंढरपुर नगरातील एका वॉचमनच्या झोपडीतून चोरट्यांनी त्यांचा मोबाईल चोरुन नेला. तीन ठिकाणी चोरी केल्यानंतर चोरट्यांच्या टोळीने तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुधाकर नगरात प्रवेश केला. याठिकाणावरील सेवानिवृत्त सैनिक योगेश कुनबी यांच्या घरात हातसफाई केली. याठिकाणाहून चोरट्यांनी सुमारे ५० ते ६० हजारांची रोकड चोरुन नेली.
जळगा शहरापासून काही अंतरावरील नवीन वस्ती झालेल्या परिसरात चोरट्यांच्या टोळीने मध्यरात्रीच्या सुमाराच चार दुकानांमध्ये चोरी केल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. तसेच चोरी करणारी टोळी या परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या वाढीव वस्तीमध्ये घरफोडीच्या घटना घडल्या त्याठिकाणी एमआयडीसी व नशिराबाद पोलिस ठाण्याची हद्द आहे. घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून हद्दीची करणे देवून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्या वादामुळे रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी व नशिराबाद पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.