Monday, December 23, 2024
Homeक्राईमशेतात जात असतांना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू

शेतात जात असतांना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू

-

जामनेर प्रतिनिधी । शेतात कोळपणी करण्यासाठी जात असताना लोंबकळलेल्या वीजतारांचा धक्का लागल्याने शेतकऱ्याची दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याबाबत पहूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी गरबड पाटील (वय ५५, रा. दोंदवाडे ता. जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, शिवाजी पाटील हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. ते शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. सध्या सर्वत्र शेती कामांना वेग आला आहे. त्यांच्या कापसाच्या शेतात कोळपणी करण्यासाठी ते शनिवारी २० ला दुपारी जात होते. त्यांनी कोळपे खांद्यावर घेऊन शेतात प्रवेश करताच लोंबकळलेल्या विजतारांना त्यांच्या खांद्यावरील कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. विजेच्या धक्क्यामुळे त्यांनी जोरात किंकाळी मारली व ते खाली कोसळले. त्यांच्या आवाजाने मजूर धावत आला, त्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले.

दरम्यान त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी उपचारांती त्यांना मयत घोषित केले. पोलीस पाटील नितीन परदेशी यांच्यासह दोंदवाडे, एकूलती, पहूर येथील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील हे करीत आहेत. महावितरण कंपनीने वीजतारा सुव्यवस्थित कराव्यात तसेच मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे .

Related articles

ताज्या बातम्या