भुसावळ प्रतिनिधी | शहरातील जामनेर रोडवरील साई मंदिराजवळील खान्देश टोलकाट्यासमोरील एका पत्र्याच्या गोडाऊनवर डीवायएसपींच्या पथकाने सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता छापा टाकून सुमारे ५ लाख २० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेलेा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील साई मंदिराच्या बाजूला असलेल्या खानदेश टोल काट्याच्या बाहेर असलेल्या पत्राच्या शेडमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या कार्यालयातील पोलिस अंमलदार नंदकिशोर सोनवणे, अनिल झुंजारराव, स्वप्निल पाटील, श्रीकांत ठाकूर यांनी सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता छापा टाकला. यावेळी गोडावूनमधून ५ लाख २० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी उमेश भगवान पाटील वय-३० रा. लहान मारुती मंदिर जवळ, तापी नगर, भुसावळ याला ताब्यात घेतले आहे. त्याचीकसून चौकशी केली असता हा माल गोडावून मालक किशोर आगीचा रा. सिंधी कॉलनी, भुसावळ यांचा असल्याचे सांगितले. पोलीसांनी प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी उमेश पाटील आणि गोडाऊन मालक किशोर आधीचा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.