Monday, December 23, 2024
Homeक्राईमजगताप खून प्रकरणी फरार तत्कालीन कारागृह अधीक्षक जिल्हापेठ पोलिसात शरण

जगताप खून प्रकरणी फरार तत्कालीन कारागृह अधीक्षक जिल्हापेठ पोलिसात शरण

-

जळगाव प्रतिनिधी | येथील जिल्हा कारागृहात २०२१ साली चिन्या जगताप खून प्रकरणी दाखल खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार तत्कालीन अधीक्षक पेट्रस गायकवाड हा संशयित आरोपी सोमवार २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला शरण आला असून त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे.

जळगाव येथील जिल्हा कारागृहामध्ये बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याला ठेवण्यात आले होते. २०२१ साली तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड याच्यासह चौघांनी त्याला बेदम मारहाण करून खून केला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील इतर चार संशयित आरोपी तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी, कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांना यापूर्वी अटक झाली आहे. तर सर्व पाचही जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे. याप्रकरणात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हा फरार होता.

या प्रकरणांमध्ये मयत चिन्या जगताप यांची पत्नीला न्याय मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागत आहे. दरम्यान आता सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पेट्रस गायकवाड (रा. विद्यानगर, पुणे) हा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला शरण आला आहे. त्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अटकपूर्व तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे.

Related articles

ताज्या बातम्या