जळगाव संदेश लाईव्ह मराठी | शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार लावत असतांना विजेचा जोरदार शॉक लागून संजय बापू पाटील वय ४२, रा. धानवड, ता. जळगाव यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार २ ऑगस्ट रोजी उमाळा शिवारातील त्यांच्या शेतात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकरी संजय पाटील हे आपल्या कुटुंंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचे उमाळा शिवारात शेत असून त्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचलेले होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास संजय पाटील हे पत्नी, वहिनी व पुतणीसह शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी गेले होते. शेतातील विहरीजवळ लावलेली मोटार सुरु करण्यासाठी संजय पाटील हे त्याठिकाणी गेले असता, त्यांना विजेचा जोरदार शॉक लागून ते शेतात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेतात काम करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना संजय पाटील यांना शॉक लागल्याचे दिसताच त्यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेतली. दरम्यान, शेतातील मजूरांच्या मदतीने त्यांना लागलीच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. कुटुंबियांच्या डोळ्यादेखत संजय पाटील यांचा मृत्यू झाल्याने त्यांनी एकच आक्रोश केला.
शेतात विजेचा शॉक लागून संजय पाटील यांचा मृत्यू झाल्याचे कळताच ग्रामस्थांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी व पुतणे असा परिवार आहे.